सर्बानंद सोनोवाल यांचा उद्या शपथविधी
Sunday, May 22nd, 2016- आसामात भाजपापर्व प्रारंभ होणार
- विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड
गुवाहाटी, [२२ मे] – भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार सर्बानंद सोनोवाल यांची आज रविवारी आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. यानंतर लगेच राज्यपाल पद्मनाभ बालकृष्ण आचार्य यांनी त्यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. २४ मे रोजी या राज्यात भाजपाचे पर्व सुरू होणार आहे. अर्थात, सर्बानंद सोनोवाल या दिवशी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
आसाम विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांची आज पहिलीच बैठक झाली. पक्षाचे वरिष्ठ आमदार हेमंत बिश्वा शर्मा यांनी सभागृहाचे नेते म्हणून सोनोवाल यांच्या नावाचा प्रस्ताव सादर केला. तर, अन्य आमदारांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. केंद्रीय मंत्री थांवरचंद गहलोत यांनी केंद्रीय निरीक्षक म्हणून भूमिका पार पाडली. भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून सोनोवाल यांच्या निवडीची घोषणा गहलोत यांनी केली.
बैठकीनंतर सोनोवाल, भाजपाचे मित्रपक्ष असलेल्या आसाम गण परिषदेचे अध्यक्ष अतुल बोरा आणि बीपीएफचे प्रमुख एच. मोहिलारी यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तो मान्य करीत राज्यपालांनी त्यांना सत्तेचे निमंत्रण दिले.
२४ मे रोजी राजभवनातील खुल्या प्रांगणात सोनोवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते आणि अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी पत्रकारांशी बोलताना सोनोवाल म्हणाले की, आसामचा विकास हाच आमचा एकमेव अजेंडा राहणार आहे.
केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा
आसामच्या मुख्यमंत्रिपदी एकमताने निवड झाल्यानंतर सर्बानंद सोनोवाल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून आज राजीनामा दिला. युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री (स्वतंत्र पदभार) असलेले सोनोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा दिला. त्यांनी तो राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविला. तो स्वीकृत करण्यात आला आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या सूचनेनुसार, राष्ट्रपतींनी या मंत्रालयाची तात्पुरती जबाबदारी पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्याकडे सोपविली आहे.
नरेंद्र मोदी निष्कलंक, महान
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निष्कलंक आणि महान व्यक्तिमत्त्व आहेत, अशी प्रतिक्रिया सोनोवाल यांनी व्यक्त केली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. नरेंद्र मोदी महान पंतप्रधान आहेत. त्यांचे चारित्र्य निष्कलंक आहे. देशातील तरुणाईवर त्यांचा अलौकिक प्रभाव आहे. त्यामुळे आसामलाही लाभ झाला आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने केलेल्या कामांमुळे भाजपा आसाममध्ये बळकट झाली. त्यांच्यामुळेच भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या कॉंग्रेसपासून राज्याला मुक्त करता आले, असे सोनोवाल म्हणाले.
Short URL: https://vrittabharati.in/?p=28421

Photo Gallery
-
दीर्घकाळ कार्यरत राहिल्याने वाढते आयुष्य
-
इंटरनेटवरील प्रभावी व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी
-
महिला शक्तीला गुगलचा डूडलद्वारे सलाम
-
स्त्रियांच्या भरारीला आकाश देखील ठेंगणे
-
भारतात लवकरच येणार ‘अच्छे दिन’
-
३ वर्षीय डॉलीचा तिरंदाजीत राष्ट्रीय विक्रम
-
ऑस्कर पुरस्कारांमध्ये ‘बर्डमॅन’ची बाजी
-
नोकरी मिळविण्यात आवाजाची भूमिका महत्त्वाची
-
मजबूत राष्ट्राकरिता एकत्र या!
-
खोबरेल तेलावर चालविला मिनी ट्रक
-
लाल द्राक्षे, शेंगदाण्यांमुळे स्मृतिभ्रंश टळतो
-
अमेरिकेत फोफावतेय् भारतीय खाद्य संस्कृती
-
गूगल विकसित करतेय कर्करोग, हृदयविकार डिटेक्टर
-
यंदा ९३ टक्केच पाऊस!