Home » बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर, सखी, स्तंभलेखक » व्यवसायाला भांडवल संवादाचं!

व्यवसायाला भांडवल संवादाचं!

॥ बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर |
| www.beejconsultancy.com |

‘भांडवल’ हे खरोखरंच फक्त ‘पैसा’ असतं का? नीट विचार केल्यावर जाणवतं की भांडवलाची व्याख्या ही पैसा, जमीन व जागा यापुरती मर्यादित नाही. त्याहीपलीकडे ‘भांडवल’ असतं… ते म्हणजे आपला ‘समाजाशी’ असलेला संवाद! आधुनिक भाषेत कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन…!

Communation

Communation

व्यवसाय म्हटलं की आपोआप ओठावर येणारा शब्द म्हणजे ‘भांडवल!’, ‘व्यवसाय उभा करण्यासाठी लागणारा पैसा…!’ म्हणजे कित्येक लोक व्यवसाय यशस्वी होण्यासाठी ‘भांडवल कमी पडलं’ असं म्हणून व्यवसायाकडे पाठ फिरवताना दिसतात. ‘पैसा’ ही जगातली अत्यंत आवश्यक गोष्ट आहेच आणि ‘भांडवल’ या शब्दाचा अर्थ आपण नकळतपणे पैशांशीच जोडतो. काही सामाजिक विचारधारांमध्ये तर भांडवल, व्यवसाय, पैसा, नफा हे शब्द अगदी शिवीसारखे सुद्धा वापरले जातात. तरीही त्याही लोकांना जगायला पैसा हवाच असतोच. रूपी बँक बुडली पण तिचं वाक्य आजही मनात आहे, ‘सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाचं नाही आणता येत!’ हे अगदी खरं आहे पण…
तरीही मला वाटतं की ‘भांडवल’ या शब्दाला एक वेगळाच अर्थ आहे. काही लोकांना मनापासून नोकरी करायला आवडत नाही. ‘नोकरी म्हणजे चाकरी’ अशी मानसिकता असलेले लोक नकारात्मक पद्धतीने व्यवसायाकडे वळताना दिसतात. पण याउलट काही उद्योगी लोक मात्र वेगळं घडवण्याची इच्छा असलेले दिसतात. हे वेगळे लोक उद्योगाच्या संधी शोधत राहतात, प्रयत्न करतात आणि आपापल्या परीने यशस्वी होतात… त्यांचं ‘भांडवल’ हे खरोखरंच फक्त ‘पैसा’ असतं का? नीट विचार केल्यावर जाणवतं की भांडवलाची व्याख्या ही पैसा, जमीन व जागा यापुरती मर्यादित नाही. त्याहीपलीकडे ‘भांडवल’ असतं… ते म्हणजे आपला ‘समाजाशी’ असलेला संवाद! आधुनिक भाषेत कम्युनिकेशन किंवा पब्लिक रिलेशन…! काही लोकांच्या कपाळावर एव्हाना आठ्या पडल्या असतील. संवादाने काय पोट भरणार आहे का? बरोबर… नाहीच भरणार पण संवादाची जादू तुमच्यासाठी व्यावसायिक जोखिम पत्करताना खूप मोठा आधार ठरु शकते.
आठ वर्षांपूर्वीची गोष्ट! माझी एक मैत्रिण व तिचा नवरा माझ्याशी गप्पा मारत होते. तिचा नवरा एकदम धडपडा! ही मैत्रिण उत्तम पत्रकार! बोलता बोलता तो म्हणाला, “परवा तुझ्याशी बोलून आम्ही एक निर्णय घेतलाय… आजपासून ६ महिन्यांनी मी नोकरी सोडणार!’’
माझ्या मनात आनंदाची लहर उठण्याआधी पोटात भीतीचा गोळा आला. (त्यावेळी मीही नोकरीच करत होते ना!)
‘अरे बापरे…’ ही प्रतिक्रिया दाबून मी उसनं अवसान आणून म्हटलं, “अरे वा!’’
मला भीती वाटण्याची दोन कारणं होती. एकतर ही दोघेही अगदी सामान्य कुटुंबातील. घरात व्यवसायाची व शिक्षणाचीही सशक्त अशी पार्श्‍वभूमी नाही. तिचा नवरा काय शिकलेला होता हे नेमकं आठवत नाही पण खूप काही शिकलेला नव्हता हे नक्की! आपल्या चटपटीत बोलण्याने तो लोकांना आपलंसं करायचा आणि महत्त्वाचं म्हणजे त्याचे सर्व थरातील, सर्व जातीधर्मांच्या लोकांमध्ये मित्र होते. मला त्याची धडपड पाहून खूपच आनंद व्हायचा. पण हे सगळं असलं तरी… एकदम नोकरी सोडून व्यवसाय करताना हे दोघं कसं जमवतील ही चिंता लागलीच…
त्यावर हा पठ्ठ्या म्हणाला, “मला कळलं की तुला भीती वाटतेय. पण घाबरू नको. मी एकदम वाजवी जोखिम घेणार आहे! आम्ही आजपासून ६ महिने माझ्या व हिच्या पगारातील थोडी थोडी रक्कम बाजूला काढून पैसे जमवणार आहे; आमच्या व्यवसायाच्या भांडवलासाठी! पण धनश्री, भांडवल म्हणजे काही फक्त पैसा नाही ना!’’
त्यानंतर तो जे म्हणाला तेव्हा आपली एम.बी.ए. मार्केटिंगची डिग्री कुठेतरी बुडवावी असाच विचार मनात आला, कारण ही माझ्यासाठी खूपच मोठी गुगली होती.
तो म्हणाला, “मला काजू विक्रीमध्ये रस आहे.’’
“अच्छा म्हणजे तू ६ महिने या व्यवसायाचा अभ्यास करणार का?’’ मी अधिरतेने विचारलं.
तो ठामपणे म्हणाला, “नाही! तो मी गेले २ वर्ष करतोय. या ६ महिन्यांत या व्यवसायातले ‘अ’, ‘ब’ आणि ‘क’ या दर्जाचे व्यापारी मला शोधून त्यांच्याशी दोस्ती करायचीय…’’
त्यानंतर तो कमालीच्या आत्मविश्‍वासाने बोलत राहिला. त्याने व्यवसायाचा अभ्यास बारकाईने केला होता. मुंबईमधले व्यापारी कुठुन माल घेतात, त्यांना काय भाव पडतो, आपण कोकणातून घेऊन कितीला देऊ शकतो वगैरे सगळं गणित त्याला तोंडपाठ होतं. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, भांडवल म्हणजे पैसा आणि पब्लिक रिलेशन या दोन महत्त्वाच्या गोष्टी होत्या. आणि त्याला या दोन गोष्टी ६ महिन्यांत उभ्या करायच्या होत्या. त्यानंतर तो हातातली नोकरी सोडणार होता. व ते त्याने खरंही करून दाखवलं… आज खरोखरच तो उत्तम व्यावसायिक आहे. कौटुंबिक पार्श्‍वभूमी नसलेले असे कित्येक तरुण संधी शोधतायत, अभ्यास करतात, कष्ट घेण्याची तयारी दाखवतायत. मला नेहमी वाटतं ही साधीसाधी माणसं आपल्या जिद्दीने, आत्मविश्‍वासाने व कल्पकतेने स्वतःचा रस्ता स्वतः तयार करतात.
या मित्राने मला एक गोष्ट शिकवली. तुम्हाला व्यवसाय नीट करायचा असेल तर, व्यवसायाचं चाक ‘संवाद’ या गोष्टीवर अवलंबून आहे. त्याच्या बोलण्यावर मी विचार करत राहिले आणि आज मला ‘संवाद’ ही गोष्ट शेतीसारखी वाटते. उदाहरणादाखल आपण एखादी खडकाळ पडिक जमीन तात्पुरती बाजूला ठेवू आणि अत्यंत सुपीक, भरपूर पाणी असलेली जमीनही क्षणभर सोडून देऊ. या उलट मध्यम सुपीकता असलेली आणि पाण्याचा साठा मर्यादित असलेली जमीन विचारात घेतली तर काय जाणवतं? अशा जमिनीमध्ये शेतकरी शेतीची मशागत करताना वेगळा विचार करतो. पाण्याचा साठा हे लक्षात घेऊन कमी पाण्यावर तग धरणारी आणि जमिनीचा पोत लक्षात घेऊन पीक काढण्याचा विचार करतो. शेतकरी फार हुशार असतो. त्याचं शेतीचं नियोजन ही व्यवस्थापनामधली फार मोठी शिकण्याची गोष्ट आहे.
तर, सांगण्याचा मुद्दा म्हणजे ‘संवाद’ ही गोष्ट जमिनीसारखी मशागत करून ठेवायची आहे. एकदा का जमीन चांगली झाली की, निरनिराळी पीकं घेऊन जमिनीची सुपीकताही वाढत जाते. भांडवल नाही म्हणजे पैसा कमी पडतो त्यांच्यासाठी ही गोष्ट मला कळकळीने सांगायचीय! पैसा लागतोच पण चार लोकांचा संपर्क जर सशक्त असेल, लोकांच्यात आपण आपली एक उत्तम प्रतिमा उभी करू शकत असू तर आपल्याला मदत मिळू शकते. अर्थात पब्लिक रिलेशन म्हणजे येणार्‍या जाणार्‍या प्रत्येक माणसाकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पहाणं नाहीच. याउलट अनेक मित्र जमवणं, त्यांच्या बरोबर अनेक विषय समजून घेणं, त्यांना त्यांच्या गोष्टींमध्ये मदत करणं, यामुळे मैत्रीची नाती पक्की होत जातात. या माणसाचा मला भविष्यात काय उपयोग होईल, असा ‘कोता’ विचार न करता माणसाशी नातं जोडणं महत्त्वाचं आहे… माणसांशी असलेलं नातं आपल्याला जगण्याची उमेद देतं, आत्मविश्‍वास देतं, संकटांमध्ये लढायला बळ देतं. पैशांचं भांडवलं उभं करायला नियोजन लागतं. एका रात्रीत चांदबिबीसारखी भिंत बांधण्याचा हा मामला नाही. तसंच माणसांच्या बाबतीतही आहे. ‘संवाद’ सकारात्मक असला की पुढच्या गोष्टी जादूसारख्या घडत जातात, हे मी अनेकदा अनुभवलंय. ‘संवाद’ म्हणजे आपलं लोकांशी बोलणं. अनेक लोकांची तक्रार असते की, ‘मला काही मित्र वगैरे फार नाहीत जेवढ्यास तेवढं असतं… बाकी काय करायचंय?’ त्यांना मला शाळेत शिकलेल्या न्यूटनच्या तिसर्‍या नियमाची आठवण करून द्यावीशी वाटतेय. वैज्ञानिक विधान सोडून त्या नियमाचा अर्थ म्हणजे, आपण दारावर जोरात लाथ मारली तर त्याच तीव्रतेचा झटका आपल्याला बसतो. म्हणजे आपण जसं वागू, तसंच लोक आपल्याशी वागतात. आपण छान बोललो की लोक छान बोलतात. आपण फटकळ बोललो की लोक आपल्याला सुनवायला कमी करत नाहीत. आपण मदत केल्यानंतर लोकही आपल्याला मदत करत राहतात. संवादाची जादू व्यवसायात चालत नाही असं म्हणणार्‍यांनी आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे. एकूण काय व्यावसायिक माणसाने सर्व जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरच घ्यायला हवी.
जाता जाता एक उदाहरण! माझी एक मैत्रिण लग्न करून शहरात आली. तिची कुणाशी ओळख ना पाळख. घरात पैशांची आवश्यकता नव्हती. पण तिला काहीतरी करायची उर्मी दाटून राहिली होती. तिच्या लहान मुलीला सांभाळायला सासूचा नकार असल्याने नोकरीची दारं बंद झाली होती. पण माणसाचा आत्मविश्‍वास व जगण्याची जिद्द त्याला अनेक संधी देत असते. तिचंही तसंच झालं. तिने तिच्या कोकणातील संपर्काचा वापर करून ‘कोकण प्रॉडक्टस्’ ती रहात असलेल्या भागात विकण्याचा विचार सुरू केला. सुरुवातीला ५००० रु. म्हणजे अगदी मोजक्या पैशांतून (घरखर्चासाठी बाजूला टाकलेल्या) थोडे प्रॉडक्टस् आणले आणि घरोघरी फिरून मार्केटिंग करायला सुरुवात केली. हे काम करताना तिला किती नकार आले असतील ते मी वेगळं सांगण्याची गरज नाही. पण कष्टाने तिने अल्पावधीतच पहाता पहाता ५०० ग्राहकांचं जाळं तयार केलं. आज तिला कुठंच जावं लागत नाही. लोक स्वतःहून फोन करतात आणि प्रॉडक्टस्चे पुरवठादार तिला क्रेडिटवर माल देतात. ती अभिमानाने सांगते, ‘माझ्या व्यवसायाचं भांडवल म्हणजे ५००० रुपये आणि मी जोडलेले ग्राहक!’
अशी गणितं औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या लोकांसाठी नाहीत… पण ते नंतर कधी तरी बोलू!
। dhanashree.bedekar@gmail.com | रविवार, दि. २७ नोव्हेंबर २०१६

साभार – सोलापूर तरुण भारत. www.tarunbharat.org

Short URL: https://vrittabharati.in/?p=35543

Posted by on Jan 26 2019. Filed under बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर, सखी, स्तंभलेखक. You can follow any responses to this entry through the RSS 2.0. You can leave a response or trackback to this entry

Leave a Reply

Change Language: press Ctrl+g

Photo Gallery

हवामान

एका नजरेत

FEATURED VIDEOS

ARCHIVES

Search by Date
Search by Category
Search with Google
More in बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर, सखी, स्तंभलेखक (2 of 111 articles)

Startup India Business
॥ बिंबप्रतिबिंब : धनश्री बेडेकर | | www.beejconsultancy.com | उद्योगासाठी लागणार्‍या अनेक गुणांपैकी कदाचित काही गुण आपल्यात नसतीलही. पण जे ...

×